नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्यापासून (सीएए) बचाव करण्यासाठी अनेक अफगाणिस्तानी आणि रोहिंग्या मुस्लीम ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहेत. यासंबंधी केंद्रीय यंत्रणांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
तसेच तपासादरम्यान किमान 25 अफगाणिस्तानी मुस्लिमांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा 2019 मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि
ख्रिश्चन धर्मीयांसाठी नागरिकत्वाचे नियम शिथील करण्यात आले आहेत.
याआधी कोणत्याही व्यक्तीला भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी किमान 11 वर्षे भारतात वास्तव्य करणे अनिवार्य होते. हा नियम शिथील करत नागरिकत्त्व मिळवण्यासाठी असणारा कार्यकाळ सहा वर्षांचा करण्यात आला आहे.
दक्षिण दिल्लीमधील अफगाण चर्चमध्ये राहणाऱ्या आबिद अहमद मॅक्सवेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधारित नागरिकत्व कायद्यानंतर अफगाणिस्तानमधील अनेक मुस्लीम ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास इच्छुक आहेत.
34 वर्षीय आबिद अहमद 21 वर्षांचे असताना भारतात आले होते. त्याचे आई-वडील सुन्नी मुस्लीम होते. अफगाणिस्तानमधील काबूल येथे ते वास्तव्यास होते. अफगाणिस्तानमधील अनेक नागरिकांनी आश्रय मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठी असणाऱ्या उच्चायुक्तांकडे अर्ज केला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानातील दीड लाखाहून जास्त मुस्लीम दिल्लीच्या पूर्व कैलाश, लाजपत नगर, अशोक नगर आणि आश्रम येथे वास्तव्यास आहेत.
याच समुदायाने नुकतेच भारतीय यंत्रणांना तालिबानी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या अफगाण शीख निदान सिंह सचेदव यांचा शोध घेण्यास मदत केली होती. याशिवाय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतात जवळपास 40 हजार रोहिंग्या मुस्लीम वास्तव्यास आहेत. जम्मू काश्मीरमध्ये यांची संख्या सर्वाधिक आहे.
मोठ्या प्रमाणात रोहिंग्या मुस्लीम 2012 पासून देशात वास्तव्यास असून आपण बांगलादेशी असल्याचे सांगत आहेत. तसेच ख्रिश्चन धर्म स्विकारत आहेत. गेल्या सहा वर्षात अफगाणिस्तान, बांगलादेशी आणि पाकिस्तानमधील जवळपास चार हजार लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.