लॉकडाऊनमुळे येऊ न शकलेल्या वकिलांना घरपोच पाठविण्यात येणार मदत
पुणे : कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टीस करणाऱ्या 29 ज्युनिअर वकिलांना दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिशन, पुणेतर्फे दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य आणि किराणा देण्यात याला. कौटुंबिक न्यायालयात याबाबतचे कीट नुकतेच देण्यात आले.
लॉकडाऊन आणि शहराचा पूर्व भाग सील केल्याने काही वकील उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना कुरिअरने हे कीट घरपोच करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष वैशाली चांदणे यांनी दिली. दरम्यान त्यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वकिलांना दरमहा सात हजार रुपये मदत देण्याची मागणी पुन्हा राज्य सरकारकडे केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊन पुकारले आहे. संपूर्ण देशातील न्यायालये सध्या बंद आहेत. त्यामुळे जुनिअर वकिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मूळातच सुरूवातील त्यांना काम कमी असते. सिनिअर वकिलांकडून त्यांना मदत मिळत असते. मात्र, सध्या न्यायालये बंद असल्यामुळे त्यांना गुजराण करणे अवघड बनले आहे.
राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने वकिलांना तीन महिने स्टायपेंड देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनकडून मदत देण्यात येत आहे. याविषयी अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे म्हणाल्या, कौटुंबिक न्यायालयातील सुमारे 50 हून अधिक जणांनी आमच्याशी संपर्क केला आहे. उर्वरित वकिलांना लवकरच अन्नधान्य आणि किराणाचे कीट देण्यात येईल.