घरांची संख्या 1 लाख 65 हजार
झोपडपट्ट्यांची वाढ लक्षणीय वेगाने
पुणे – शहरात एकूण 486 झोपडपट्ट्या असून शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 28 टक्के नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. आयटी, एज्युकेशन हब यामुळे विस्तारणाऱ्या पुण्यात झोपडपट्ट्याही वेगाने वाढत असल्याचे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे.
महाराष्ट्रातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुणे वेगाने उदयाला येत आहे. सामाजिक सुरक्षितता अन् उच्च दर्जाच्या नागरी सुविधांमुळे होणारे स्थलांतर शहरवाढीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार, पुणे शहराची स्थलांतरित लोकसंख्या (रोजगार आणि शिक्षणासाठी) एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के इतकी आहे. मागील दशकात लोकसंख्या वाढीचा दर 22.73 टक्के इतका होता. त्यामुळे 2011 च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या 31.24 लाख आणि स्थलांतरित अंदाजे 4 ते 5 लाख म्हणजे एकूण लोकसंख्या अंदाजे 35 ते 36 लाख आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुण्यात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या संधी वाढत आहेत. विकसित आयटी हब, बांधकाम क्षेत्र, लहान-मोठे उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्रात रोजगार निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध विभागांमधून विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार पुण्याकडे धाव घेत आहे. बांधकाम क्षेत्रही त्या तुलनेत वाढत असल्याने त्यासाठी लागणाऱ्या मजुरांचे प्रमाणही लक्षणीय आहे. हा मजूरवर्ग आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याने तो झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. त्यामुळे झोपडपट्ट्यांचा विस्तारही वेगाने झाला आहे.
आजमितीस शहराच्या तब्बल 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये घोषीत आणि अघोषित अशा एकूण 486 झोपडपट्ट्या आणि वस्त्या आहेत. त्यामध्ये तब्बल साडे सहा लाख मजूर वास्तव्यास आहेत. झोपड्पट्टीमधील एकूण घरांची संख्या 1 लाख 65 हजार इतकी असल्याचे पर्यावरण अहवालात नमूद केले आहे.