आणखी 900 नव्या करोनाबाधितांची भर
पिंपरी – ‘करोना’मुळे रोज शहरातील रुग्णांचा मृत्यू होत आहे. गेल्या 24 तासांत करोनाने आणखी 26 बळी घेतले असून 900 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. तसेच 618 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
करोनामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या 26 बाधितांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी 17 रुग्ण हे मनपा हद्दीतील असून 9 रुग्ण हे हद्दीबाहेरील रहिवासी असले तरी शहरात उपचार घेत होते. यामुळे शहरातील करोनाच्या एकूण मृत्यूंचा आकडा 966 वर पोहोचला आहे. त्यापैकी 794 मृत्यू हे शहरातील नागरिकांचे आहेत, तर 166 शहराबाहेरील रुग्णांचा शहरात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.
तसेच गेल्या 24 तासांमध्ये शहरातील 869 आणि शहराबाहेरील 31 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. आज वाढलेल्या 869 रुग्णांमुळे आतापर्यंतच्या करोनाबाधितांचा आकडा 42517 इतका झाला आहे. सोमवारी 618 करोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्यांची संख्या 28575 इतकी झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या चार महिन्यांमध्ये एकूण 157209 संशयितांच्या स्वॅबची तपासणी केली असून त्यापैकी 112874 नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर 1818 रुग्णांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. सोमवारी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 6723 करोनाबाधित उपचार घेत आहेत.