पुणे – चांदणी चौक येथे उड्डाणपुलासाठीच्या कॉलमचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील एकूण 32 गर्डरपैकी 25 गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरचे 9 पैकी 5 गर्डरचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम प्रगतीपथावर आहे. सेवा रस्त्याच्या 4 स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू आहे. चांदणी चौक प्रकल्पाचे एकूण 95 टक्के काम पूर्ण झाले असून जुलै अखेर किंवा ऑगस्ट 2023 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चांदणी चौक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी कदम यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास, प्रकल्प समन्वयक किशोर भरेकर, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, सुरक्षा अधिकारी कुंदन कुणाल आदी उपस्थित होते. चांदणी चौक येथे उड्डाणपुलासाठी टाकण्यात येत असलेल्या सेवा रस्त्यावरील गर्डरची लांबी 22 ते 35 मी. इतकी आहे. तर मुख्य रस्त्यावरील गर्डरची लांबी 57.5 मी. इतकी आहे.
- प्रकल्पाचे एकूण 95 टक्के काम
- मुख्य रस्त्यावर स्लॅब बांधणीचे काम सुरू
- सेवा रस्त्याच्या 4 स्लॅबचे काम पूर्ण
- ऑगस्ट 2023 पर्यंत काम पूर्ण करणार
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चांदणी चौकातील कामाची पाहणी करून सद्यस्थितीतील कामाबद्दल व चौकातील इतर कामांचा आढावा घेतला. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
चांदणी चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. या ठिकाणांहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. गेल्या वर्षभरात प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील मुख्य अडचणी म्हणजे रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे व स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणी गतीने कार्यवाही करत दूर करण्यात आल्या आहेत. गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले.