पैसे घ्यायला आला अन् अडकला : चंद्रकांत पाटील यांच्या तोतया स्वीय सहायकास अटक
पिंपरी – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका रुग्णालयाकडे 25 लाखांची खंडणी मागितली. मात्र निगडी पोलिसांनी आरोपीला पैशाचे आमिष दाखवून बोलविले. पोलिसांनी विणलेल्या जाळ्यात एक आरोपी अलगद अडकला. तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. पुण्यात बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
सौरभ अष्टुल (वय 21, रा. गंजपेठ, पुणे) असे निगडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सौरभ याने एका नारळ विक्रेत्याचा फोन चोरला. नातेवाईकाच्या मदतीने त्याने अनेकांना गंडा घालण्यासाठी तयारी केली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने त्याने अनेकांना फोन करून करोनाबाधित नागरिकांना मदत करण्यासाठी पैशांची मागणी केली. निगडीतील एका रुग्णालयाकडेही 25 लाखांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास बघून घेण्याची भाषाही केली. याबाबत 17 जुलै रोजी अदखलपात्र आणि त्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल झाला.
हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यापैकी एका आर्किटेक्टच्या नावाने पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जाळे लावले. लॉकडाऊनच्या काळात 21 हजार रुपये देऊ, असे आरोपीला सांगून पैसे घेण्यासाठी बोलविले. पैसे देताना पोलिसांनी रक्कम मोजण्यात आरोपीला गुंतवून ठेवले. तेवढ्यात इतर पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्यास पकडले. मात्र घटनास्थळावरून काही अंतरावर उभा असलेला त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.