मुंबई : ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी फरार केपी गोसावीचा बॉडीगार्ड आणि पंच प्रभाकर साईलने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आपल्याला कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या करायला लावल्याचेही साईलने सांगितलं. प्रभाकर क्रूजवरील छापेमारीचा साक्षीदार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची मागणी झाली. मात्र 18 कोटींवर डील फायनल झाली. त्यापैकी आठ कोटी समीर वानखेडेंना द्यायच ठरलं होतं, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल याने केला आहे. प्रभाकरने एक व्हिडीओ शेअर करून या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम माध्यमांसमोर मांडला आहे.
आर्यनला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन येणारा किरण गोसावी एक खासगी गुप्तहेर असून त्याचं याप्रकरणात नाव समोर आल्यानंतर तो गायब झाला आहे. याच किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं एनसीबीच्या कारवाईबाबत गौप्यस्फोट केला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी क्रूझवर केलेल्या छापेमारीवेळी आपल्याकडून जबरदस्तीनं कोऱ्या कागदांवर पंचनामा म्हणून साक्षीदाराच्या रुपात सह्या घेण्यात आल्या, असा दावा प्रभाकर साईल यानं केला आहे. आपल्याला अटक करण्यात आलेल्यांबाबत कोणतीही माहिती नव्हती, असंही तो म्हणाला आहे.
प्रभाकर म्हणाला, क्रुझवर ड्रग्ज मिळाले की नाही याबाबत कल्पना नाही. परंतु आपल्याकडून कोऱ्या कागदावर घेण्यात आलेल्या स्वाक्षऱ्यांचा वापर आर्यन प्रकरणात करण्यात आला. किरण गोसावी कुणासोबत तरी फोनवर बोलत होता. ज्यात २५ कोटींचा बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख होता. ही डील १८ कोटींमध्ये सेटल होणार होती. ज्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते. या संवादात शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीकडून पैसे घेण्याचा उल्लेख होता. मात्र पूजा फोन उचलत नव्हती असंही संवादात म्हटलं गेले.
दरम्यान मुंबई क्रुझवर धाड टाकण्यापूर्वी किरण गोसावीला NCB कार्यालयाबाहेर सॅम डिसुझा नावाचा व्यक्ती भेटला होता. छापेमारीवेळी सावधतेने काही व्हिडीओ आणि फोटो घेतले गेले. एका व्हिडीओत स्पष्टपणे दिसत होतं की, गोसावीने ताब्यात घेण्यापूर्वी आर्यन खान कुणाशी तरी फोनवरुन संवाद साधत होता. या कारवाईमागे मोठं षडयंत्र असल्याचा संशय प्रभाकर साईलनं व्यक्त केला आहे.