घोडेगाव – नेवासा तालुक्यातील चांदा येथे मंगळवारी मध्यरात्री एक वाजता गंगाधर कर्डिले यांच्या वस्तीवर चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरट्यांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात ओंकार गंगाधर कर्डिले (वय-२२) हा युवक ठार झाला आहे. इतर दोन जखमी झाले आहेत. चोरट्यांशी झालेल्या झटापटीत कर्डिले वस्ती वरील तीन जण गंभीर जखमी झाले, त्यातील ओंकार गंगाधर कर्डिले हा युवक ठार झाला. इतर दोघांनाही मोठ्या दुखापती झाल्या आहेत. दोघांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
चांदा लोहारवाडी रोड वरील कर्डिले वस्ती या ठिकाणी काल महाशिवरात्रीच्या रात्री साधारण 12 ते 1 च्या दरम्यान चोरट्यांनी बापू भाऊसाहेब कर्डिले यांच्या वस्तीवर प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अर्चना कर्डिले व आई नर्मदा कर्डिले यांना दहशत करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवून नेले. यावेळी बापू कर्डिले, त्यांचे चुलते गंगाधर नामदेव कर्डिले, सुभाष नामदेव कर्डिले आदी कर्डिले वस्तीवरील लोक जागे होऊन चोरट्यांच्या पाठीमागे पळाले.
शेजारीच कांद्याच्या शेतात त्यांनी एकाला पकडले मात्र पाठीमागून अंधारात लपून बसलेल्या दुसऱ्याने पळत येऊन त्यातील तिघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आपले लोक जखमी झाल्याचे पाहून कर्डिले वस्ती वरील लोकांनी चोरट्याला सोडुन जखमींना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
घटनेची खबर समजताच सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल फोजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पहाटे तीन वाजेच्या दरम्यान श्वान पथकही आले होते. सकाळी 9 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरीचा तपास लवकर लावला जाईल, असे उपस्थितांना सांगितले.