ओतूरमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम : विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद
ओतूर -ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूरमध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी आवड, प्रेम, जिव्हाळा व जनजागृती निर्माण व्हावी यासाठी पक्ष्यांसाठी पर्यावरण पूरक घरटी बनविणे स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेत 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अशी माहिती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.
दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, शेतामध्ये होणारी रासायनिक फवारणी आदी कारणांमुळे हवेचे प्रदूषण, वाहनांमूळे होणारे ध्वनी प्रदूषण यांमुळे पक्ष्यांच्या संख्येवर दिवसेंदिवस परिणाम होत आहे. पक्षी स्थलांतर करीत आहेत. काही पक्ष्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पक्ष्यांची संख्या वाढावी, ते स्थलांतरित होऊ नयेत, ते आपल्याच परिसरात राहवेत, पर्यावरणाचा समतोल रहावा, यासाठी पक्ष्यांना आपलंस वाटेल, असे निसर्गातच घर बनवून देणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय हरित सेना प्रमूख संतोष कांबळे यांनी सांगितले.
प्लॅस्टीक, थर्माकोलचा वापर न करता बांबू, गवत, सुतळी, कागदी पुठ्यांचा रोल, झाडांची पाने व वाया गेलेले प्लायवूड, लाकडी फळ्या या पर्यावरणपूरक साधनांपासून पक्ष्यांसाठी घरटी कशी तयार करायची, यासाठी कला शिक्षक रोहिणी घाटकर, सत्यवान खंडाळे व राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संतोष कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेत 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी बनविलेली 200 घरे त्यांच्याच घराच्या परिसरात, शेताच्या बांधावर असलेल्या झाडांवर बसविण्यात आली. स्पर्धेतील विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे- श्रावणी वारूळे, साहिल साबळे, देवेन गीते, तनिष्का खेत्री, ऋग्वेद ठिकेकर, श्रेया डुंबरे, प्रांजल बटवाल, सिद्धी तांबे, सानिका पानसरे, विनायक डुंबरे, प्रथा पिंपळे, भूषण शिरसाठ, तनुजा चातूर, प्रिया यादव, पियुष यादव, योगिता सूर्यवंशी, तृप्ती कोंडार.
पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल ओतूर ग्रामविकास मंडळचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, ज्ञानेश्वर पानसरे, संजय ढमढेरे, बबन डुंबरे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.