द्रुतगती महामार्गावरील टोल दरवाढीला सर्व स्तरांतून विरोध
पुणे -पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर टोलवसुलीच्या अंदाजापेक्षा मागील 15 वर्षांत दीडपट जास्त टोलवसुली झाली आहे. प्रत्येक महिन्यात धावलेली वाहने आणि जमा टोल या आकड्यांचा मेळ जुळत नाही. दोन कंत्राटदारांच्या आकडेवारीत मोठा फरक आहे. नवीन कंत्राटदाराच्या दर महिन्याच्या आकडेवारीतही प्रचंड फरक आहे. या रस्त्यावरील टोल मधील झोलची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच तज्ञ संस्थेकडून दरवर्षी या रस्त्यावरून भविष्यात किती वाहने धावतील याचा लेखाजोखा करून घ्यावा. सध्यस्थितीत या द्रुतगती महामार्गावरील टोलदर वाढीला स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.
2004मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18 टक्के दरवाढ करण्याचे ठरले होते. मात्र, या मागचा अंदाज असा होता, की महामार्गावरील वाहतूक दरवर्षी 5 टक्के वाढेल. 2004 ते 2019 या काळात या अंदाजानुसार कंत्राटदाराला 2 हजार 869 कोटी रुपये मिळणार, असे गृहीत धरून ठेका देण्यात आला. प्रत्यक्षात आकडेवारीनुसार ठेकेदाराला 4 हजार 369 कोटी रुपये मिळाले, असे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.
संबंधित कंत्राटदाराने जानेवारीत अचानक वाहने आणि जमा टोल जवळपास 10 % ने कमी दाखवला आहे. जानेवारीत 43 लाख वाहने धावली आणि 74 कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. या सर्व माहितीवरून टोल वसुली ठेकेदार देत असलेली आकडेवारीत गौडबंगाल असून, याची चौकशी व्हावी.
– विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच
टोलवसुली करणाऱ्या ठेकेदारांचे दावे :
अहवाल क्र. 1- एप्रिल ते जुलै 2019 या चार महिन्यांत महामार्गावर 1 कोटी 72 लाख 50 हजार 391 वाहने धावली. जी सरासरी 43 लाख वाहने प्रति महिना अशी येते. यामध्ये टोल न भरलेल्या वाहनांची संख्याही समाविष्ट असल्याचे ठेकेदाराने म्हटले आहे. या काळात सरासरी प्रतिमहा 60 कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे दाखवले गेले आहे.
अहवाल क्र. 2- नवीन ठेकेदाराने सप्टेंबर 2019 ची आकडेवारी दिली आहे. त्यामध्ये या रस्त्यावरून 16 लाख 90 हजार वाहने धावल्याचे दाखवले गेले आहे. त्यामधून 59 कोटी 70 लाख रुपये मिळालेले आहेत.
अहवाल क्र. 3- नवीन ठेकेदाराने ऑक्टोबर 2019 ची आकडेवारी दिली आहे. त्यामध्ये या रस्त्यावरून 19 लाख वाहने धावली आणि त्यांच्याकडून 67 कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे.
अहवाल क्र. 4- नोव्हेंबर 2019 ची ही आकडेवारी असून त्यामध्ये 19 लाख 34 हजार वाहने धावल्याचे दाखवले आहे. तर 71 कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दिसून येते. तर डिसेंबर 2019 ची आकडेवारी दिली असून, त्यामध्ये रस्त्यावरून 46 लाख 74 हजार वाहने धावल्याचे दाखवले असून त्यांच्याकडून 81 कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे.