पुणे –खासगी विना अनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या काही प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांना 1 नोव्हेंबर 2020 पासून 20 टक्के वाढीव अनुदान पात्र घोषित करण्यात आले आहे. या वाढीव अनुदानासाठी निधीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
राज्यातील 456 प्राथमिक शाळांमधील 2 हजार 566 शिक्षक व 345 शाळांच्या 1 हजार 340 वर्ग, तुकड्यांवरील 1 हजार 565 शिक्षक पदे अशा एकूण 4 हजार 131 शिक्षक पदांना वाढीव अनुदान देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. 1 हजार 553 माध्यमिक शाळांमधील 7 हजार 745 शिक्षक व 5 हजार 775 शिक्षकेत्तर अशा एकूण 13 हजार 520 शिक्षक, शिक्षकेत्तर पदांना व 1 हजार 38 माध्यमिक शाळांमधील 2 हजार 771 वर्ग तुकड्यांवरील 3 हजार 779 शिक्षक पदांना वाढीव अनुदान मिळणार आहे.
वाढीव अनुदान देण्यासाठी शिक्षक पदांवरील विद्यमान वेतनमानानुसार होणारा वार्षिक आवर्ती खर्च अदा करण्यासाठी वेतनच्या सहायक अनुदान या लेखाशीर्षातून त्या त्या वर्षीच्या मंजूर अनुदानातून भागवावा लागणार आहे, असे विभागाच्या आदेशात म्हटले आहे.