- विनामास्क आढळले 40 हजार नागरिक
- करोनाचे गांभीर्य नाही
पिंपरी – करोना प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत महापालिका प्रशासनाने निर्गमित केलेल्या विविध सूचना आणि आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या 45 हजार 143 व्यक्तींवर महापालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून आजअखेर पर्यंत सुमारे 2 कोटी 8 लाख 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर यामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या तब्बल 39 हजार 827 इतकी आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 99 लाख रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधितांच्या संख्येमध्ये दिवसागणिक भर पडत आहे. दररोज सरासरी 1500 हून अधिकजणांना करोनाची बाधा होत आहे. आजपर्यंत शहरातील 1 लाख 26 हजार 936 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 2758 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने करोना प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत विविध प्रकारचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मास्कचा वापर करावा, अनावश्यक गर्दी करु नये, नियमानुसार परवानगी घेऊन व्यक्ती संख्येच्या मर्यादा पाळून कार्यक्रमाचे आयोजन करावे आदी सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या विविध सूचना आणि आदेशांचे पालन करावे असे नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरी देखील काही नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पथकामध्ये महापालिका, पोलीस प्रशासन आणि शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे मंगल कार्यालये, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे, विविध कार्यालये, हॉटेल्स्, महत्वाच्या बाजारपेठा, चौक, आस्थापना, भाजी मंडई अशा विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्यात येत आहे. विनामास्क आढळणाऱ्या तसेच व्यक्ती व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.
कारवाईचे स्वरुप नागरिक दंड
विना मास्क 39,827 1 कोटी 99 लाख 13 हजार
सार्वजनिकठिकाणी थुंकणे 5,286 8 लाख 41 हजार
सामाजिक अंतराचे उल्लंघन ——— 75 हजार
नियमांचे काटेकोरपणे पालन करा – आयुक्त
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कारवाई सुरु राहणार असून नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. करोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करावे.राजेश पाटील, आयुक्त