चेन्नई – तामीळनाडूतील विधानसभेच्या निवडणूकीचा प्रचार रंगात येऊ लागला तसे अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांची पोस्टरबाजी सुरू झाली आहे. मात्र या राजकीय पक्षांच्या पोस्टरवर चक्क लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या श्रीलंकेतील बंडखोर संघटनेचा दिवंगत म्होरक्या वेलुपिल्लई प्रभाकरन याचा फोटो दिसायला लागला आहे.
प्रभाकरन याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनंतरही तमिळी जनतेमध्ये त्याच्याबद्दल आपुलकीची भावना आहे आणि राजकीय वर्तुळात त्याच्या नावाचे वजन अद्यापही कायम आहे, हेच यावरून दिसून येते आहे.
पुडुकोत्तयी जिल्ह्यातल्या तिरुमयम मतदारसंघातून नाम तमिल्लर कोची (एनटीके) पक्षाकडून शिव रामन हे उमेदवार आहेत. त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी उभारलेल्या भव्य पोस्टर आणि कट आऊटमध्ये चक्क प्रभाकरनचा फोटो वापरला आहे.
“एनटीके’पक्षाच्या सेतामिझन सीमन, “एमडीएमके’चे नेते आणि राज्यसभेतील खासदार वैको यांनीही प्रचारादरम्यान प्रभाकरन यांच्या फोटो असलेल्या पोस्टरचा वापर सुरू केला आहे. याशिवाय वेलुथलाय चिरुथैगल काची (व्हीसीके) पक्षाचे नेते थोल थिरुमवलान यांनीही त्यांच्या प्रचारात प्रभाकरनचा फोटो असलेल्या पोस्टरचा वापर करायला सुरुवात केली आहे.
प्रभाकरन 18 मे 2009 रोजी श्रीलंकेतील सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये ठार झाला होता. तामीळनाडू विधानसभेच्या निवडणूकीसाठी 6 एप्रिलला मतदान होणार आहे. तर निवडणूकीचा निकाल 2 मे रोजी जाहीऱ होणार आहे.