गेल्या 5 वर्षांत खड्डे दुरुस्तीसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा खर्च
पुणे – पावसाळ्यापूर्वीची रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने गेल्या 5 वर्षांत तब्बल 10 कोटी रुपयांचा चुराडा केला आहे. त्यात पथ विभागाने 2016-17 ते 2019-20 पर्यंत तब्बल 3 कोटी 14 लाख रुपये खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी खर्च केले असून पाच परिमंडळांकडून 2015 ते 2019-20 या पाच वर्षांत सुमारे 6 कोटी 88 लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा करणाऱ्या पालिकेस खड्डे दुरूस्तीसाठी एवढा मोठा खर्च करावा लागत असल्याने शहरातील पावसाळ्यातील स्थितीचा अनुभव या आकड्यांवरूनही येतो. नगरसेवक रफिक शेख यांनी याबाबत ऑगस्टच्या मुख्यसभेसाठी माहिती विचारली होती. यातून ही बाब समोर आली आहे.
महापालिकेकडून शहरात पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरूस्तीसाठी रस्त्यांचे सर्वेक्षण त्याचे रिसर्फेसिंग तसेच पॅच वर्क केले जाते. त्यासाठीचे काम पथविभाग तसेच परिमंडळांकडूनही केले जाते. यासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूदही उपलब्ध करून देण्यात येते. त्यातून प्रामुख्याने पावसाळ्यात पडणाऱ्या खड्डे दुरूस्तीसाठी खर्च केला जातो. 2015-16 ते 2019-20 या पाच वर्षांत परिमंडळ 1 ते 5 साठी अंदाजपत्रकात तब्बल 9 कोटी 95 लाख 16 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
यातील सुमारे 6 कोटी 88 लाख रुपये खड्डे दुरूस्तीवर खर्च करण्यात आले आहेत. या शिवाय, पथ विभागाकडून 2016-17 या आर्थिक वर्षात 83 लाख 93 हजार रुपये, 2017-18 मध्ये 1 कोटी 12 लाख 48 हजार, तर 2019-20 मध्ये गेल्या दोन महिन्यांत तब्बल 52 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे, असे समोर आले आहे.
‘रिसर्फेसिंग’साठी 69 कोटींचा खर्च
पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांचे पथ विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाते. यानंतर पावसाळयात ज्या रस्त्यांवर खड्डे पडू शकतील, अशा रस्त्यांचे “रिसर्फेसिंग’ केले जाते. त्यासाठी पथ विभागाने 69 कोटींचा खर्च केला आहे. त्यात 2016-17 मध्ये 38 कोटी, 2017-18 मध्ये 14 कोटी, 2018-19 मध्ये 16 कोटी रुपयांचा खर्च पथ विभागाने केल्याची माहिती देण्यात आली आहे.