महापौर, उपमहापौर निवडणूक लांबली

तीन महिने मुदतवाढ : राज्यभरात निर्णय लागू

पुणे – राज्यातील महापौर आणि उपमहापौर निवडणुकींना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने आता मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौरांना मुदतवाढ मिळणार आहे.

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचा कार्यकाळ दि.15 सप्टेंबर रोजी संपणार होता, परंतू मंगळवारच्या या निर्णयामुळे महापौरांना 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या महापौर म्हणून ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांची वर्णी लागली. तर, पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेत आलेल्या भाजपने नितीन काळजे यांना संधी दिली होती.

सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने महापौर बदलत राहुल जाधव यांना संधी दिली. पुण्यातही असाच बदल होऊन पाच वर्षांच्या सत्ता काळात किमान चार नगरसेवकांना महापौरपदी संधी मिळेल, अशी भाजप नगरसेवकांना अपेक्षा होती. प्रथमच 98 सदस्यांसह एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपमधील ज्येष्ठ नगरसेविकांनी यासाठी तशी “फिल्डिंग’ही लावली होती. परंतू भाजप नेत्यांनी टिळक यांनाच पुढे संधी दिली.

टिळक यांची सप्टेंबरमध्ये मुदत संपत असताना अनेक इच्छुकांचे महापौर आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले होते. परंतू राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या मुदतवाढीमुळे इच्छुकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.