पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वैद्यकीय विभागाची कायमस्वरुपी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी (दि. 25) परीक्षा पार पडणार आहे. महापालिकेमध्ये सात विविध पदाअंतर्गत 128 पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 19 हजार 56 जणांनी अर्ज केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला. त्यामुळे अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत. तसेच, दर महिन्यास किमान 50 ते 100 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर तसेच, स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवृत्त होत आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी आहे. तर दुसरीकडे दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिकेवर ताण येत आहे. तसेच महापालिकेची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे.
एप्रिल महिन्यामध्ये राज्य शासनाने सर्व महापालिकांना नोकर भरती करण्यात परवानगी दिली आहे. त्यानुसार महापालिकेमध्ये पहिल्या टप्यामध्ये वैद्यकीय विभागांच्या पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी 19 हजार 56 जणांनी अर्ज केले आहेत. शनिवारी राज्यातील 13 शहरांमध्ये 47 केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
त्यासाठी टीसीएस या खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्निशयन, फार्मासिस्ट, एएनएम या सात पदांची भरती करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य शासनाने महापालिका आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता दिली आहे. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च 35 टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असा सूचना नगर विकास विभागाने महापालिकेस दिल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेने ही भरतीप्रक्रिया सुरू केली आहे.
स्टाफ नर्ससाठी सर्वाधिक अर्ज
स्टाफ नर्स या पदासाठी सर्वाधित अर्ज आले आहेत. या पदाच्या 70 जागा असून त्यासाठी तब्बल 10 हजार 15 अर्ज आले आहेत. तर त्याखालोखाल एएनएम या पदासाठी 4 हजार 26 अर्ज आले असून त्याच्या 31 जागा आहेत.