सातारा – सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत उत्साह आहे. सातारा व जावळी तालुक्यातील 182 गावांमधील गणेशोत्सव मंडळांना प्रसादासाठी माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रवा आणि साखर भेट देऊन या मंडळांच्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत केला आहे.
शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते विलास कासार, जितेंद्र मोहिते, चंदन घोडके, डी. पी. शेख, संदीप भणगे, महेश यादव गेल्या दोन दिवसांपासून सातारा आणि जावळी तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर जाऊन गणेश मंडळांना प्रसादासाठी रवा आणि साखर भेट देत आहेत. सातारा शहरालगतच्या सैदापूर, पानमळेवाडी, रामनगर, कुशी, नागेवाडीपासून जावळी तालुक्यातील रायगाव, खर्शी, कुडाळ, करहर, मेढा, केळघर, आनेवाडी, सोमर्डी, बामणोली, कास, रेंगडी, गांजे, आंबेघर परिसरातील 182 गावांमधील 300 मंडळांना या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी पाच किलो साखर आणि पाच किलो रव्याचे वाटप केले. मंडळांच्या कार्यकर्त्यांना टी शर्टचेही वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी कौतुक केले. दुर्गम भागातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना गावाबाहेर क्वचितच पडता येते. त्यांच्यापर्यंत जिन्नस पोहोचवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवल्याचे सांगण्यात आले.