मुंबई – गोविंदांच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर 2023 पर्यंत ही शासकीय विमा कवच योजना लागू राहणार आहे. गोविंदांसाठी राज्य सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी गोविंदा आणि गोविंदा पथकांसंदर्भात राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यापैकी काही निर्णयांची आता राज्य सरकारकडून अंमलबजावणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दहीहंडी जवळ आली असून राज्यभरात दहीहंडीसाठी गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच गोविंदांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेत यासंदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश जारी केले आहेत.
गेल्यावर्षी 50 हजार गोविंदांना राज्य सरकारकडून शासकीय विमा कवच देण्यात आले होते. पण आता ही संख्या वाढवून 75 हजारांपर्यंत करण्यात आली आहे.
म्हणजेच, राज्यभरातील 75 हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त 25 हजार गोविंदांना राज्य सरकारने विमा कवच दिले आहे.
प्रो-गोविंदा स्पर्धा 31 ऑगस्टला
2014 पासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार अशी मागणी होती, ती यंदा पूर्ण होत आहे. वरळी येथे डोम थिएटरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी मुंबई येथील वरळीच्या डोम या ऑडिटोरियममध्ये प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन राज्य समन्वय समितीद्वारा करण्यात येणार आहे, या समितीस शासनाने मान्यता दिली आहे.