बिकानेर – राजस्थानातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून 17 जणांना अटक करण्यात आली आहे. बिकानेर आणि जयपूरमधील पदांच्या भरती परीक्षेत हा घोटाळा झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घोटाळ्याप्रकरणात यापूर्वी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाचाही समावेश आहे. तर इतर 7 जणांना जयपूरमधून अटक करण्यात आली आहे. या मुख्याध्यापकांनी व्हॉटस ऍपवरुन प्रश्नपत्रिका काही जणांना पुरवल्या होत्या, या व्यक्तींनी पूर्वतयारीसाठी या प्रश्नपत्रिका इतरांना फॉरवर्ड केल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या गैरव्यवहाराची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी परीक्षा केंद्राजवळून 7 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या मोबाईलमध्ये उमेदवारांचा तपशील आणि रोख 1 लाख रुपये सापडले होते. या घोटाळ्याबाबत अधिक तपशील उघड करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.