बिगुल वाजला : 15 वर्षांनंतर बाजार समिती निवडणुकीचा “धुरळा’?

 निवडणूक कार्यक्रम कोर्टापुढे, पण हालचाली कागदावरच राहण्याची चिन्हे

पुणे – मागील पंधरा वर्षांपासून फक्त चर्चेत असणाऱ्या पुणे बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल पुन्हा एकदा वाजले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक प्राधिकरण आणि बाजार समितीने प्रशासनाने 31 मार्च 2020 पर्यंत निवडणूक घेण्याबाबत प्रयोगात्मक (टेन्टेटिव्ह) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. शासनाने तो कार्यक्रम उच्च न्यायालयात सादर केला आहे. दरम्यान, मागील 15 वर्षांपासून पुणे बाजार समितीच्या निवडणुकीची चर्चा आहे. त्यातच शासनाचे राष्ट्रीय बाजाराचे धोरण आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीच्या निवडणुकीच्या हालचाली फक्त कागदोपत्री ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

बाजार समितीमध्ये 15 वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. बाजार समितीची यापूर्वी निवडणूक 1999 साली झाली होती. ते संचालक मंडळ 2002 -03 मध्ये बरखास्त करण्यात आले. त्यानंतर आजतागायत निवडणूक झालेली नाही. न्यायालयीन विवादात निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले, तेव्हा या बाजार समितीच्या कायद्यात बदल करून पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असा दर्जा दिला. त्यामुळे नवीन संस्था स्थापन झाल्याने पुन्हा दोन ते तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू राहिली. पुन्हा न्यायालयीन मुद्दा आला, की संस्थेचे फेरफार केले. त्यानंतर पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे बनविली आहे. प्रशासक आणि अशासकीय मंडळानेच आजवर कारभार हाकला आहे. आता पुन्हा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच केंद्र सरकारचे धोरण राष्ट्रीय बाजार करण्याचे आहे. निवडणुकीनंतर त्याबाबतचे पुन्हा विधेयक सादर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ही प्रक्रिया कागदोपत्री ठरण्याचे चित्र आहे.

कोणाला करता येणार मतदान?
या निवडणुकीसाठी पुणे, मुळशी, पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेली तालुक्‍यातील 10 गुंठे शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना मतदार करता येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह एकत्रित कार्यक्रम तयार केला आहे. 30 ऑक्‍टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या मतदार याद्या डिसेंबर अखेरपर्यंत करण्यात येणार आहेत. त्यानंतर जानेवारीमध्ये त्या जाहीर केल्या जातील. त्यातून हरकती सूचना मागविल्या जातील.

याचिकेदरम्यान निवडणुका कधी घेणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. त्यावर महाधिवक्ता यांच्याशी पणनमंत्री राम शिंदे, आणि आपण स्वतः चर्चा केली. त्यांच्या सल्ल्यानुसार
निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
– बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती.

Leave A Reply

Your email address will not be published.