पुणे – काश्मीरमधून कलम 370 आणि 35 अ रद्द करून, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश घोषित केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे संपूर्ण देशभरातून स्वागत केले जात आहे. पुण्यातही अनेक संस्थांनी त्याचे स्वागत करत जल्लोष केला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न आज साकार झाले. या ऐतिहासिक निर्णयाचे खडकवासला मतदार संघातर्फे फटाके फोडून व लोकांना पेढे वाटून स्वागत करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख महेश पोकळे, शाखाप्रमुख कल्पेश वाजे व शिवसैनिक उपस्थित होते.
तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथेही विविध संघटनांकडून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी सावरकर अध्यासन केंद्राचे प्रल्हाद राठी, विश्व हिंदू परिषदेचे श्रीनिवास कुलकर्णी, भाजप युवा मोर्चाचे प्रदीप गावडे, बापू पडळकर, डॉ.चंद्रकांत परुळेकर, भरत अमदापुरे, सचिन पाटील, डॉ. आकाश राठोड, सागर शिंदे आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.