रांची – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या दोन माजी व्यावसायिक भागीदारांवर १५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. त्याने रांचीच्या दिवाणी न्यायालयात अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या बिस्वास यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.
कंपनी आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता. करार करताना कंपनीने केलेल्या करारांचे पालन केले नाही, असा धोनीचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
करारामध्ये अर्का स्पोर्ट्स फ्रँचायझी फी भरणे आणि नफ्याची वाटणी करणे बंधनकारक होते, परंतु कंपनीने तसे केले नाही. महेंद्रसिंग धोनीने कंपनीला अनेक नोटिसा पाठवल्या, पण कंपनीने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा नफ्यातील वाटाही दिला नाही. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणला. महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमीसाठी केलेल्या करारात फसवणूक आणि आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी रांचीच्या दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
देश-विदेशात क्रिकेट कोचिंग सेंटर्स उघडली
कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्यानंतरही कंपनीने कोणताही निर्णय न घेतल्याने आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. कंपनीने महेंद्रसिंग धोनीच्या नावाने देश-विदेशात अनेक क्रिकेट अकादमी उघडल्या होत्या, पण २०२१ मध्ये करार संपल्यानंतर त्या बंद झाल्या.