नवी दिल्ली: जगातील अनेक देशांमध्ये सध्या करोना विषाणूचा कहर असल्याचे दिसून येत आहे. हा विषाणू चीनमध्ये जानेवारीत आढळला होता. यानंतर तीन महिन्यातच हा विषाणू जगभरात पसरला आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे 20 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून 1 लाख 27 हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. परंतु जगात अजूनही असे 15 देश आहेत जेथे करोना पोहोचू शकलेला नाही.
चीनमधून पसरलेला करोना विषाणू जगातील सात खंडांपैकी 6 खंडांवर पोहोचला आहे. करोनाने आतापर्यत 210 देशांना विळख्यात घेतले आहे. मात्र, अंटार्क्टिका हा एकमेव खंड आहे जिथे करोना विषाणूने प्रवेश केलेला नाही. तसेच अन्य असे काही देश असे आहेत की जिथे करोनाचा प्रसार झालेला नाही.
करोना प्रसार न होण्यामधील पहिले कारण म्हणजे, या देशांमध्ये कमी असलेली लोकसंख्या. या 15 देशांपैकी बहुतेक देश हे लहान बेटे आहेत. ही बेटे जास्त प्रसिद्ध नसल्याने येथे पर्यटक खूपच कमी प्रमाणात येतात. यामुळे येथे सोशल डिस्टंन्सिंग हा नियम आपोआपच पाळला गेला आहे.
विशेष म्हणजे, क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे सतत चर्चेत असणारा उत्तर कोरिया करोना संकटातून वाचला आहे. चीनची सीमा असूनही या देशात करोनाचा प्रादुर्भाव दिसून न आल्याने आश्चर्य मानले जात आहे. स्वत:ला करोनामुक्त म्हणून घोषित करीत उत्तर कोरियाने खबरदारी म्हणून सर्व रस्ते, समुद्र आणि हवाई मार्ग बंद केल्याचे सांगितले आहे.
करोनामुक्त असलेले देश
कोमोरोस, किरिबाती, लेसोथो, मार्शल आयलॅंड्स, मायक्रोनेशिया, नॉरू, उत्तर कोरिया, पलाऊ, समोआ, सोलोमन आइलैंड्स, ताजिकिस्तान, टोंगा, तुर्कमेनिस्तान, तुवालु, वानुअतु.