सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून 14 गावांची मुक्तता

वनमंत्र्यांची मान्यता : आ. शंभूराज देसाई यांची माहिती
सणबूर – पाटण विधानसभा मतदार संघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी 14 गावे बफर झोनमध्ये घेण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात नुकतीच आमदार देसाई यांनी त्यांची भेट घेतली असता मंगळवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 14 गावे वगळण्यास त्यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून येत्या दोनच दिवसात यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी 14 गावे बफर झोनमध्ये घेण्याची कार्यवाही शासनस्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती. या प्रस्तावावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा याकरीता आमदार देसाई यांचा पाठपुरावा सुरू होता. वनमंत्री ना. सुधिर मुनगंटीवार कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाच्या उद्‌घाटन समारंभास आले असता या विभागातील पदाधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष भेट घेवून ही गावे वगळण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करावी, अशी मागणी केली होती.

तेव्हा त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ही 14 गावे वगळण्याचा आदेश येत्या 60 दिवसात काढण्यात येईल असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर विधानसभा अधिवेशनात प्रत्यक्ष भेट घेवून पुनश्‍च: या विषयाची त्यांना आठवण करुन दिली होती. तेव्हा त्यांनी वनविभागांच्या प्रधान सचिव यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ती 14 गावे वगळण्याचा आदेश तात्काळ काढावा असे लेखी आदेश दिले होते. त्यास मंगळवारी वनमंत्री यांनी स्वत: मान्यता दिली असून अंतिम मान्यतेकरीता हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. दोनच दिवसात यावर अंतिम निर्णय होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.