हिमांशू
असह्य उकाड्याने हैराण झालेला प्रत्येक जीव आता पावसाळ्याची वाट पाहतो आहे आणि पावसाळा लांबणार असे सांगून हवामान खाते आणि हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या खासगी कंपन्या लोकांना आणखी चिंतेत टाकत आहेत. सुमारे 15-20 वर्षांपूर्वी नियमित पाऊस सुरू होत असे. म्हणजेच, नियमित पाऊस एकदाही पाहिला नाही, अशी पिढी आता तरुण झाली आहे. आता 30-35 वर्षे वय असणाऱ्या व्यक्तींना मात्र बोलावल्यासारखा 7 जूनला येणारा पाऊस आठवत असेल.
पावसाळ्याचे चारही महिने पाऊस तळ ठोकून असायचा. वारकऱ्यांना चिंब भिजवणाऱ्या आषाढसरी वेगळ्या… श्रावणातला ऊन-पावसाचा लपंडाव वेगळा… पावसाचे कितीतरी रंग या चार महिन्यांत पाहायला मिळायचे… तेही नियमितपणे! आता पावसाळ्यातले पावसाचे दिवस कमी होत चाललेत आणि एकाच दिवशी मुसळधार पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही आपल्या कर्माची फळं आहेत, असे मानायला कुणी तयार नाही आणि उगवत्या पिढीला या बदलांशी काही देणंघेणं उरलेले नाही. पावसावर कविता करायचे दिवस संपलेत आणि “आमच्या नळाला वर्षभर पाणी येणार की नाही, तेवढं सांगा…’ असा रोकडा आणि कोरडा प्रश्न विचारण्याचे दिवस आलेत. तरीसुद्धा आजही सर्वजण कशासाठी तरी पावसाची वाट पाहतात, ही त्यातल्या त्यात सकारात्मक बाब म्हणता येईल. निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना काहीजण नवी छत्री घेण्यासाठी पावसाची वाट पाहात असतील, हे पटणार नाही कदाचित; पण हे खरं आहे. दुष्काळ वगैरे ज्यांच्यासाठी “दृष्टीआडची सृष्टी’ आहे, त्यांनी अशा कारणांसाठीच पावसाची वाट पाहणे अपेक्षित आहे.
बाजारात कोणतेही नवे गॅजेट आले की वेड लागल्यासारखे धावत सुटणारी ही मंडळी आता स्वयंचलित छत्रीखालून चालण्यासाठी पावसाची वाट पाहताहेत. आपण समृद्ध आणि तंत्रसमृद्ध आहोत; सबब आपला देशही समृद्ध आहे, अशी त्यांची पक्की धारणा आहे. या छत्रीत आर्टिफिशियल इन्टेलिजन्स आणि ड्रोन या तंत्रज्ञानांचा मिलाफ केलाय. माणसाला दोनच हात. त्यातला एक छत्रीत कशासाठी गुंतवायचा? खरं तर दोन्ही हात मोकळेच पाहिजेत. तर आणि तरच हातातल्या मोबाइलचा व्यवस्थित वापर करता येणे शक्य आहे.
स्वयंचलित छत्री आपल्या डोक्यावरून आपोआप उडत राहील. आपले डोकं आणि त्याहून महत्त्वाचा मोबाइल अजिबात भिजू देणार नाही. कमाल आहे ना तंत्रज्ञानाची? डोक्यात असो वा नसो, डोक्यावर उडणाऱ्या छत्रीत मेंदू असणे हीच आजची खरी गरज! या छत्रीत “फॉलो मी मोड’ आहे. छत्रीला जोडलेला मेंदू आपल्या मालकाला ओळखून त्याच्या डोक्यावरून उडत राहणार आणि छत्रीखालून चालणाऱ्या माणसाचा मेंदू हातातल्या मोबाइलमध्ये गुंतून राहणार. किती मज्जा ना? छत्री पावसाप्रमाणेच उन्हासाठीही वापरतात. भरउन्हात स्वयंचलित छत्रीखालून फिरले तर कडक उन्हाळ्याचा आणि त्याच्या कारणांचा विचार करण्याची गरजच काय?