मनिला: मालवाहू नौकेला मच्छिमारांची बोट धडकून झालेल्या अपघातानंतर 14 मच्छिमार समुद्रात बेपत्ता झाले असल्याचे फिलीपाईन्सच्या तटरक्षक दलाने सांगितले. या धडकेनंतर मच्छिमार बोट बुडाली का आणि खराब हवामानामुळे शोधमोहिमेत काही अडथळे येत आहेत का, याबाबत कोस्टगार्डने स्पष्टपणे माहिती दिली नाही.
एमव्ही व्हिएन्ना वूड या मालवाहू नौकेची एफव्ही लिबर्टी 5 या मच्छिमार बोटीला रविवारी मध्यरात्रीनंतर समुद्रामध्ये धडक झाली. राजधानी मनिलाच्या दक्षिणेकडे मिदोरो ऑक्सिडेन्टल मिन्दोरो या शहराच्या माम्बुराओ या किनाऱ्यापासून 27 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली.
बेपत्ता झालेल्या मच्छिमारांच्या शोधासाठी कोस्टगार्डचे विमान आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संयुक्तपणे शोध घेतला जात आहे. एकूण 12 मच्छिमार आणि लिबर्टी 5 बोटीवरील 2 प्रवासी बेपत्ता झाले आहेत, असे कोस्ट गार्डचे प्रवक्ते अर्मान्दो बालिलो यांनी सांगितले. मालवाहू नौकेमध्ये कोणतेही सामान लादलेले नव्हते. ही नौका ऑस्ट्रेलियाकडे निघाली होती.