काबुल – अफगाणिस्तानमधील हेमंड प्रांतात एका बाजारपेठेत झालेल्या एका कार बॉम्बस्फोट आणि मॉर्टारच्या हल्ल्यामध्ये किमान 23 जण ठार झाले. मृतांमध्ये लहान मुलांचही समावेश आहे. या हल्ल्यासाठी तालिबान आणि अफगाण लष्कर दोघेही एकमेकांना जबाबदार धरत आहेत. ल्ष्कराने बाजारपेठेत मोर्टार डागले, असा दावा तालिबानने केला. तर तालिबानने कारबॉम्ब घडवून नंतर मोर्टार डागल्याचा आरोप लष्कराच्या वतीने करण्यात आला.
या भागामध्ये लष्कराच्या वतीने कोणतीही कारवाई केली गेलेली नव्हती आणि कारबॉम्बच्या स्फोटात दोन तालिबानीदेखील मारले गेले, असेही लष्कराने म्हटले आहे. संगीन जिल्ह्यातल्या अत्यंत वर्दळीच्या बाजारपेठेमध्ये हा हल्ला झाला.
दोन्ही बाजूंनी संघर्षादरम्यान नागरिकांच्या मृत्यूबाबत अधिक सावधगिरी बाळगण्यास संयुक्तराष्ट्राने अलीकडील निवेदनात सांगितले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही संयुक्त राष्ट्राने आपल्या निवेदनात म्हटले आहे.