रांची – 2017 च्या टेरर फंडिंग प्रकरणी फोटोग्राफर पत्रकार कमरान युसुफ, विक्रेता जावेद अहमद भट आणि विभाजनवादी नेत्या आसियां आंद्रबी या तिघांची दिल्लीतील न्यायालयाने पुरेशा पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तर अन्य 14 जणांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
या 14 जणांमध्ये लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद, हिज्बुल-मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन, “जेकेएलएफ’चा माजी प्रमुख यासिन मलिक, शबीर शाह, दिवंगत एसएएस गिलानी यांचे जावई अल्ताफ अहमद शाह, जहूर अहमद शाह वाटाली आणि फारुख अहमद दार यांचा समावेश आहे.
मुक्तता करण्यात आलेल्यांपैकी युसुफ आणि भट हे जम्मू काश्मीरमधील दगडफेकीच्या विविध घटनांमध्ये सहभागी होते. काही दहशतवादी संघटनांच्या स्थानिक हस्तकांचेही त्यांना सहकार्य लाभले होते, असे “एनआयए’ ने म्हटले होते. मात्र त्यांच्याविरोधात पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांची सुटका करण्याचे आदेश “एनआयए’च्या विशेष न्यायालयाने दिले.