पुणे – शाळांमध्ये मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार घडू नयेत, यासाठी दक्षता घ्यावी. कोणत्याही घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहेत.
जिल्ह्यात, विभागात कोणत्याही शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास त्याची माहिती शिक्षण आयुक्तालयास द्यावी. संबंधित शैक्षणिक संस्थेस, शाळेत भेट देवून वस्तुस्थिती समजावून घेवून सकृतदर्शनी संस्थेकडून, शाळेकडून चूक झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत नियमानुसार कारवाई करावी. त्याचा पूर्तता अहवाल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्याकडे सादर करावा, अशा सूचना मांढरे यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.
संबंधित प्रकरणी कार्यवाही न झाल्यास प्रकरणपरत्वे विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येवून पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. कारवाईत दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयास विनाविलंब सादर करण्याची जबाबदारी शिक्षण संचालकांवर सोपविण्यात आलेली आहे.