पुणे : समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र व दिल्ली येथे यूपीएससीची पूर्वतयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्यात येते. या परीक्षेमध्ये 14 उमेदवारांनी घवघवीत यश मिळविले आहे.
अविनाश शिंदे, नवनाथ माने, अशीत कांबळे, करून गरड, सौरभ व्हटकर, अभिजित सरकाते, प्रज्ञा खंदारे, निखिल दुबे, शशांक माने, सुमित रामटेके, शुभम भैसारे, वैभव वाघमारे, संग्राम शिंदे आणि अजिंक्य विद्यागर अशी 14 यशस्वी उमदेवारांची नावे आहे. यूपीएससीच्या अंतिम निकालात या उमेदवारांनी रॅंक मिळविली आहे.
या सर्व यशस्वितांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक केले. या सर्व भावी अधिकाऱ्यांचा मला अभिमान आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपल्या या यशाचा व पदाचा वापर समाज, राज्य व देशाच्या हितासाठी करा, अशा शब्दात मुंडे यांनी या सर्व भावी अधिकाऱ्यांना फेसबुक पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या.
पुण्यातील बार्टीच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्र व दिल्ली येथील नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये तयारीसाठी प्रायोजकत्व दिले जाते. या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 14 विद्यार्थ्यांनी यूपीएससी मुख्य परीक्षेत यश संपादन केले, ही बाब अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.