मॉस्को – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी रशियाने 130 बस सोडण्याची तयारी दाखवली आहे. भारतीय आणि अन्य विदेशी नागरिकांच्या सुटकेसाठी या बस सज्ज असल्याचे रशियाने म्हटले आहे.
युक्रेनमधील बेलगोर्ड भागातील खारकीव्ह आणि सर्नी या शहरांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी या बस सोडण्यात येणार असल्याचे रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल-जनरल मिखाईल मिझिंतसेव्ह यांनी आज सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परतू देण्यासाठी सहाय्य करावे, अशी विनंती केली होती. दोन्ही नेत्यांदरम्यान भारतीयांच्या सुखरुप परतण्याच्या योजनेविषयी सविस्तर चर्चा झाली होती.