अलिगड, (उत्तर प्रदेश): लॉकडाऊनच्या आदेशांचा भंग केल्याबद्दल तबलिगी जमातच्या 13 सदस्यांना आज अटक करण्यात आली. त्यामध्ये दोघे श्रीलंकेचे नागरिक आहेत. त्यांच्या अटकेची माहिती श्रीलंकेच्या दूतावासास कळवण्यात आले आहे. हे सर्वजण लॉकडाऊनच्या आदेशांचा भंग करून मशिदीमध्ये रहात होते, असे पोलिसांनी सांगितले.
यासर्वांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 (सार्वजनिक आदेशांचा भंग करणे) आणि कलम 269 (जीवघेणा साथीचा रोग पसरवण्यादृष्टीने निष्काळजीपणा करणे) खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या नागरिकांवर विदेशी नागरिक कायद्या या कलम 14 आणि 14 क अंतगत व्हिसा नियमांचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान धार्मिक स्थळे आणि पूजास्थळे बंद ठेवण्याचे आदेश केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देण्यात आले आहेत. 25 मार्च रोजी लॉकडाऊन लागू केल्यापासून लपून बसलेल्या तबलीगी जमातमधील सर्व सदस्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी मोहीम सुरू केली आहे.
मार्च महिन्यात दिल्लीतील निझामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक समारंभास देशभरातून आणि विदेशातूनही अनेकजण सहभागी झाले होते. त्या एकत्रिकरणामुळेच करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे मानले जात आहे.