नवी दिल्ली: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात आज मोठी वाढ केली आहे. आजची ही वाढ पेट्रोल मध्ये प्रति लिटर 10 रूपये आणि डिझेल मध्ये प्रति लिटर 13 रूपये इतकी मोठी आहे. कच्चा तेलाच्या किमंती प्रचंड प्रमाणात उतल्या असून त्याचा जनतेला मिळणारा लाभ आता सरकारने या द्वारे परस्पर काढून घेतला आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत मात्र चालू आर्थिक वर्षातच तब्बल 1 लाख 60 हजार कोटी रूपयांची भर पडणार आहे. गेल्या दोन महिन्याच्या अवधीत सरकारने केलेली ही दुसरी मोठी उत्पादन शुल्क वाढ आहे.
सरकारने 14 मार्च रोजी उत्पादन शुल्कात जी वाढ केली होती त्यातून सरकारला 39000 कोटींचे अतिरीक्ती उत्पन्न मिळाले आहे. त्यावेळी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रति लीटर तीन रूपये इतकी वाढ करण्यात आली होती. या दोन्ही वाढींमुळे सरकारला दरवर्षी किमान दोन लाख कोटी रूपयांचे अतिरीक्त उत्पन्न मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर खुपच उतरले होते त्यामुळे तेल कंपन्यांनी 14 मे पासून पेट्रोल व डिझेलचे दर गोठवले होते. वास्तविक या तेलाचे दर रोजच्या रोज जाहींर करणे अपेक्षित होते. ती पद्धत अवलंबली असती तर पेट्रोल व डिझेलचे दर कमी होऊ शकले असते. पण सरकारला उत्पादन शुल्क वाढवण्यास अवधी मिळावा म्हणून ही दर कपात रोखली गेली होती असे आता सांगितले जाऊ लागले आहे. मोदी सरकारने आत्तापर्यंत वेळोवेळी जी उत्पादन शुल्क वाढ केली आहे तिचा एकत्रित विचार केला तर आज एका लिटर पेट्रोल वर 32 रूपये 98 पैसे आणि एका लिटर डिझेलवर 31 रूपये 83 पेैसे इतके उत्पादन शुल्क आकारले जात आहे.