- दोघांचा मृत्यू : दिवसभरात नऊ जणांना “डिस्चार्ज’
लोणावळा – लोणावळा शहरात शुक्रवारी (दि. 28) विविध विभागातून 13 नवे करोनाबधित रुग्ण आढळून आले आहे. एकीकडे शहरात रोज नव्या रुग्णांची नोंद होत असताना दुसरीकडे करोनावर मात केली. प्रकृतीमध्ये सुधारणा झालेल्या 9 रुग्णांना आज “डिस्चार्ज’ देखील देण्यात आला आहे. त्याचबरोबर लोणावळा शहरातील दोन करोनाबधितांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील घडली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातील भांगरवाडी विभागात तीन महिला व एक पुरुष असे एकूण चार जणांचे अहवाल “पॉझिटिव्ह’ आले आहे. खंडाळा विभागात एक महिला, एक 13 वर्षीय मुलगी आणि एक 10 वर्षीय मुलगा अशा तिघा जणांचे करोनाची बाधा झाली. न्यू तुंगार्ली विभागातील एक महिला आणि एक युवक अशा दोघांना करोनाची लागण झाली आहे. याशिवाय वलवण, भुशीगाव, तुंगार्ली आणि हुडको येथील प्रत्येकी एक जणाचा करोना चाचणी अहवाल “पॉझिटिव्ह’ आला आहे.
शहरातील एक 77 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीचा करोनामुळे शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांत शहरातील करोनामुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे. याशिवाय मागील चार ते पाच दिवसांपूर्वी खंडाळा येथील एका 53 वर्षीय व्यक्तीचा देखील करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती नगरपरिषदेकडे प्राप्त झाली. त्यामुळे लोणावळा शहरातील आतापर्यंत मृत झालेल्या एकूण बधितांची संख्या 12 झाली आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर एकूण करोना बधितांची संख्या 242 झाली आहे; तर आतापर्यंत 132 रुग्णांना रुग्णालयातून “डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील करोनामुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या 12 असून, सध्या सक्रिय करोना बधितांची संख्या 98 इतकी आहे.