पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमच्या पीजी महाविद्यालयातील १२९ निवासी डाॅक्टरांना वाढीव विद्यावेतनाचा फायदा होणार आहे. मार्ड संघटनेने केलेल्या संपानंतर नुकताच राज्य सरकारने १० हजार रुपये वाढीव विद्यावेतनाचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत निवासी डाॅक्टरांना हा फायदा होणार आहे. यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध सुविधा दिल्यामुळे निवासी डाॅक्टरांनी आपले काम सुरूच ठेवले होते.
महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला होता. त्यावर राज्य सरकारने यशस्वी तोडगा काढला आहे. विद्यावेतनात १० हजार रुपयांची घसघशीत वाढ केल्यानंतर मार्ड संघटनेने संप मागे घेतला आहे. राज्यभरातील निवासी डॉक्टर या संपामध्ये सहभागी होणार होते. मात्र, तत्पूर्वीच हा प्रस्तावित संप मिटवण्यात सरकारला यश आले.
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था देणे. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करणे. विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे. या संघटनेच्या मागण्या होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पीजी महाविद्यालयात सध्या १२९ निवासी डाॅक्टर आहेत. त्यांना या वाढीव विद्यावेतनाचा लाभ होणार आहे. तसेच सर्व सोयी सुविधांनी युक्त वसतिगृह दिले आहे. या बरोबरच इतरही मागण्यांचा सकारात्मक निर्णय घेतल्याने या महाविद्यालयातील निवासी डाॅक्टरांनी संपाला पाठिंबा देत आपले कामकाज नियमीत चालू ठेवल्याची माहिती रुग्णालय वायसीएम वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली.