मार्केट यार्डात झेंडूच्या फुलांची 122 टन आवक

पुणे – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा मंगळवारी (दि. 8) आहे. दसऱ्याच्या स्वागताला झेंडू असतोच. याच कारणामुळे मार्केट यार्डातील फूल विभागात रविवारी झेंडूची तब्बल 122 टन आवक झाली. त्यामध्ये विजयादशमीच्या सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे फुलांना मोठी मागणी असते. झेंडूसह शेवंती, ऑस्टर, गुलछडी, जर्बेरा, गुलाब यासह इतर फुलांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते.

पांढरी शेवंती 19 हजार 355 किलो, पिवळी शेवंती 2 हजार 13 किलो, सुट्टा ऑस्टर 4 हजार 99 किलो, गुलछडी 6 हजार 877 किलो, जर्बेरा 9 हजार 175 गड्डी, डचगुलाब 6 हजार 50 गड्डी इतकी आवक झाली असल्याची माहिती फूलबाजार विभाग प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली

मार्केट यार्डात जरी इतकी मोठी आवक झाली असली, तरीही शेतकरी स्वत:हून शहरातील विविध भागात फुलांची विक्री केली. घाऊक बाजारात झेंडूल प्रतिनुसार किलोस 20 ते 50 रुपये, तुळजापुरी झेंडूस 40 ते 60 रुपये, पांढरी शेवंती 60 ते 130 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात 50 ते 100 रुपये प्रतिकिलोने झेंडूची विक्री केली जात आहे.

दरवर्षी दसऱ्याला नेहमीच फुलांची मोठी मागणी असते. त्यामुळे दसऱ्याला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी माल राखून ठेवत असतात. त्यानुसार जिल्ह्यासह सोलापूर, नगर, कोल्हापूर, जिल्ह्याहून फुलांची आवक झाली आहे. मार्केट यार्डातील सर्व रस्त्यांवर किरकोळ विक्रेते, शेतकरी फुलांची विक्री करत आहेत. पहाटेपासूनच किरकोळ विक्रेते, ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या भावात वाढ झाली आहे. मात्र, भावामध्ये फारशी वाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

याशिवाय बिजली :60-120, कापरी : 30-60, ऍस्टर : 20-40, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 30-50, गुलछडी काडी : 20-60, डच गुलाब (20 नग) : 60-100, लिलि बंडल : 15-25, जर्बेरा: 20-40, कार्नेशियन : 80-120 ला प्रतीकिलोस हा भाव मिळत आहे.

जुई, चमेलीच्या फुलांना मागणी
शहरात फुल विक्रेत्यांकडून जुई, चमेलीच्या फुलांना मागणी वाढली आहे. मार्केट यार्डतील घाऊक बाजारात रविवारी जुईच्या 1 किलोस 1 हजार 900 रुपये तर चमेलीच्या 1 किलोस 1 हजार रुपये भाव मिळाला. यंदा नवरात्रामध्ये जुई व चमेलीच्या फुलांना समाधानकारक भाव मिळत असल्याने फुलउत्पादकांमध्ये आनंदाचे वातावण आहे. सद्यस्थितीत फुलबाजारात म्हातोबाची आळंदी, उरळी कांचन यासह जिल्ह्याच्या विविध भागांतून जुईची तर, तळेगाव ढमढेरे परिसरातून चमेलीची आवक होत आहे. फुलबाजारात चमेलीची 12 ते 13 किलो तर, जुईची 60 ते 70 किलोंची आवक झाली असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. तर, फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर म्हणाले, जुई, चमेली या फुलांना नवरात्री काळात मोठी मागणी रहाते. चमेलीच्या फुलांना जास्त सुवास असल्याने या फुलांना महिला वर्गाची मोठी पसंती रहाते. यंदा दुष्काळ तसेच अतिवृष्टीमुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. आवक कमी असल्याने या फुलांना उच्चांकी भाव मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)