चाफळ – चाफळ विभागातील डेरवण, ता. पाटण येथे दहा महिन्यांच्या बाळाला करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्याने विभागात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी डेरवण, वाघजाईवाडी, जाळगेवाडी, माथनेवाडी या गावांची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.
दरम्यान, ना. देसाई यांनी गावांतील तसेच परिसरातील नाकाबंदी करण्यात आलेल्या एकूण 9 वाड्यावस्त्यांवरील जनतेला घाबरू नका, ही परिस्थिती आटोक्यात येईल, तुमची काळजी घेण्यासाठी मी स्वतः तसेच तालुका प्रशासन सतर्क असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. तुम्ही गावकऱ्यांनी घराच्या बाहेर पडू नका, जीवनावश्यक वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची तसेच तुमच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आवाहन मंत्री देसाई यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रघुनाथ पाटील, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ग्रामसेवक वसंत पवार आदी उपस्थित होते.