राज्यात 118 कोटींचे दागिने, दारू, रोख रक्कम जप्त 

आचारसंहिता उल्लंघनाचे 15 हजार गुन्हे दाखल 

मुंबई –
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभागाने राज्यभरात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 118 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 44 कोटी 22 लाख रुपये रोकड, 22 कोटी 5 लाख रुपये किमतीची 28 कोटी 47 लाख लिटर दारु, 6.30 कोटी रुपयांचे मादक पदार्थ, 45.47 कोटी रुपयांचे सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहिर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. निवडणूकीच्या काळात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभागांच्या अधिकाऱ्यांचे धाडसत्र सुरु आहे. लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यापासून विविध कारवाईत आतापर्यंत 15 हजार 95 आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कालमांतर्गत 337 गुन्हे, लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत 48 गुन्हे, अनधिकृतरित्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक आशा स्वरुपाचे 13 हजार 702 गुन्हे, बेकायदेशीररित्या शस्त्र, जिलेटीन व इतर स्वरूपाचे स्फोटक पदार्थ बाळगणे आदींबाबत 601 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नशेचे पदार्थ (नारकोटिक्‍स ड्रग्ज) बाळगल्याबाबतचे 111, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत 12 गुन्हे, अन्न व औषध अधिनियमांतर्गत 52, इतर 9 गुन्हे आदींचा समावेश आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शस्त्र परवानाधारकाकडून 40 हजार 97 शस्त्रे तर सूचना देऊनही जमा न केलेली 30 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तर 135 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय शस्त्र अधिनियमांतर्गत 1350 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

“सी-व्हिजिल’ ऍपवर 3 हजार तक्रारी

“सी-व्हिजिल’ ऍपवर आतापर्यंत दाखल 3 हजार 211 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 1 हजार 866 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून त्यामध्ये जिल्हा स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या ऍपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.