पौड – मुळशी तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंचपदाच्या 23 जागांसाठी तब्बल 111 जणांनी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहे, तर सदस्यांसाठी 317 अर्ज दाखल झाले. पौड येथे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारांनी अर्ज भरले, त्यामुळे आता प्रबळ इच्छुकांना इतरांच्या माघारीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. शासकीय सुट्टी आल्याने उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवधी मिळाला आहे, याचा फायदा उमेदवारांना होणार आहे.
तालुक्यात 23 ग्रामपंचायतीच्या आणि 13 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता, त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. संभवे येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने हे पद रिक्त राहिले असून वातुंडे येथे सरपंचपदासाठी समीक्षा गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. जामगावला सरपंचासाठी सर्वाधिक 11 जण इच्छूक आहेत.
संभवे येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. परंतु, या प्रवर्गाचा एकही उमेदवार न मिळाल्याने येथील सरपंचपद रिक्त राहिले आहे. सदस्यांमध्येही आंबवणे ग्रामपंचायतीतून सर्वाधिक 24 अर्ज आले, तर वातुंडेतून सर्वात कमी 5 अर्ज आल्याने येथील दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकींचाही कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात लव्हार्डे येथील दोन जागा पुन्हा रिक्त राहिल्या. कासार आंबोलीत दोन जागांसाठी 11 अर्ज आले आहेत.