चिंता कायम; आठवडाभरात 1,100 ऑक्सिजन बेड उभारणार

पुणे विभागीय आयुक्त : प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी

पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भाग मिळून सर्व खासगी रुग्णालयांमध्ये 2,200 बेड असे आहेत, तेथे ऑक्सिजन बेड उपलब्ध करता येणे शक्य आहेत. त्यामुळे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत यातील निम्म्या बेडला ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करा, अशा सूचना खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. या सूचनाची अंमलबजावणी झाली तर येत्या सात दिवसांत सुमारे 1,100 ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकणार आहेत.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचा आढावा घेतला. तसेच काही खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या. त्यावेळी टोपे यांनी सूचना दिल्या. त्यानुसार याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी काढणार आहेत.

 

राव म्हणाले, “दि.2 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात 3 हजार 151 ऑक्सिजन नसलेल्या बेड्सची आवश्यकता भासेल, असा अंदाज आहे. त्यानुसार मागील पाच दिवसांत असे 588 बेड उपलब्ध केले आहेत. तर ऑक्सिजन बेडची 2,066 इतकी आवश्यकता भासेल. तर मागील पाच दिवसांत असे 564 बेड्स वाढवले आहेत. तर आयसीयूच्या 331 बेड्सची आवश्यता असेल. सध्या 81 बेड्स वाढवले आहेत. तर व्हेंटिलेटर बेड्सची 250 आवश्यकता असून यामध्ये 30 बेड्स वाढवले आहेत. यांसह जम्बो रुग्णालय, बाणेर कोविड सेंटर, ससून रुग्णालय, डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध करण्याचे नियोजन सुरू आहे.’

 

आणखी रुग्ण वाढणार

ऑक्सिजनविरहीत बेडची कमतरता भासणार नाही, यासाठी शहरासह ग्रामीण भागात नियोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान, जिल्ह्यात 3 लाख 23 हजार 539 करोना पॉझिटिव्ह असतील, असा अंदाज आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ही 67, 894 एवढी असण्याची शक्यता आहे. यानुसार सध्या बेड उपलब्ध करण्यासाठी नियोजन सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.