चांगला निर्णय…माजी सैनिकांच्या कार्याला अनोखी सलामी

30 हजार सैनिकांना मिळणार मिळकत करात सवलत

पुणे – राज्य सरकारच्या सैनिक सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 8 हजार वीरपत्नी आणि तब्बल तीस हजार माजी सैनिकांना मिळकत करात सवलतीचा लाभ मिळत आहे. माजी सैनिक आणि वीरपत्नींसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरत असल्याची भावना जिल्हा सैनिक कल्याण मंडळाने व्यक्त केली आहे.

 

राज्य सरकारने लागू केलेल्या “बाळासाहेब ठाकरे सैनिक सन्मान योजने’अंतर्गत आतापर्यंत केवळ वीरपत्नींना मिळकत करात सवलतीचा लाभ मिळत होता. मात्र, नुकतेच या योजनेसाठी माजी सैनिकांचाही समावेश केला आहे. याबाबत मंडळाचे वरिष्ठ अधिकारी मिलिंद तुंगार म्हणाले, “मंडळाने 2016 साली दिलेल्या प्रस्तवानुसार, मंडळाने वीरपत्नींना मिळकत करात सवलतीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी माजी सैनिकांना ही सवलत लागू करण्यात आली नव्हती.

 

आता या निर्णयानुसार माजी सैनिकांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीये. केवळ त्यांचे सैनिकी ओळखपत्र आणि मालमत्ता कराची पावती या दोन गोष्टींच्या आधारावर ही सवलत दिली जाणार असल्याने हा माजी सैनिकांचा खऱ्या अर्थाने सन्मान ठरणार आहे.’

 

ही योजना पूर्ण राज्यातील माजी सैनिकांसाठी लागू असणार आहे. राज्यात 15 वर्षे अथवा त्याहून अधिक काळ वास्तव्य करणारे आणि स्वत:चे घर असलेले माजी सैनिक, वीरपत्नी या योजनेस पात्र असतील. तसेच वीरपत्नीला ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील मालमत्तेसाठी कर सवलत मिळणार असल्याचेही तुंगार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.