पुणे -महसूल विभागामध्ये महत्त्वाचे पद असलेल्या तलाठी या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया मागील महिन्यांपासून सुरू झाली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात एकूण 4 हजार 644 तलाठ्यांची पदे भरली जाणार आहेत. या परीक्षेसाठी महिनाभरात तब्बल 11 लाख 50 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत दि. 25 जुलै 2023 आहे.
दोनशे गुणांची परीक्षा
तलाठी पदासाठी एकूण दोनशे गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची वयोमर्यादा मोजण्यासाठी 17 जुलै 2023 हा दिनांक असेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.