- वर्षभर ओनेक्स हॉस्पिटलमध्ये केली डॉक्टर म्हणून नोकरी
पिंपरी – कोणतेही प्रमाणपत्र नसलेल्या आणि गेल्या वर्षभरापासून एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. ही घटना पिंपरी येथे घडली.
अक्षय केशव नेहरकर (रा. बिजलीनगर चिंचवड, मूळ रा. पिसेगाव, ता. केज, जि. बीड), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल भास्कर काटकर (वय 49, रा. वरळी, कोळीवाड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नेहरकर याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पदवी असल्याचे भासवले. वैद्यकीय कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळवण्यासाठी आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्स कंपनीस ई-मेलद्वारे रिझ्यूम पाठवला. त्यामध्ये बीएएमएस तसेच एमडी ऍपियर पदवी टाकून सिटी केअर हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, ओएनपी लीला हॉस्पिटल, ऑनेक्स हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून नोकरी केल्याचे नमूद केले. तसेच मुलाखती दरम्यान डॉक्टर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पिंपरी-चिंचवड येथून पदवी घेतल्याचे व पदवीचा रजि. नं. 91420-बी असा असल्याचे सांगितले. पदवी प्रमाणपत्राची मागणी केली असता ते न दाखविता आरोपीने ओनेक्स हॉस्पिटल बिजलीनगर येथे सुमारे एक वर्षापासून डॉक्टर म्हणून नोकरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी अक्षय नेहरकर याने आयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स पिंपरी व पुणे विभाग यांच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर 5 फेब्रुवारी 2021 रोजी रिझ्यूम पाठवला. त्याला पिंपरी कार्यालयात मुलाखतीसाठी बोलावले. त्यावेळी तो पदवीची कागदपत्रे सादर करू शकला नाही. तसेच तो डॉक्टर म्हणून नोकरी करीत असलेल्या हॉस्पिटलमधून संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे मोबदल्यासाठी अनेक प्रकरणे आली. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला संशय आला. त्यांनी आरोपीच्या पदवीबाबत संबंधित संस्थेकडे विचारणा केली असता अशी पदवी दिली नसल्याचे 25 मे 2021 रोजी निष्पन्न झाले. त्यानुसार इन्शुरन्स कंपनीचे विशाल काटकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपी नेहरकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्याचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाल्याने त्याने पोलिसांना सांगितले. मात्र इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी त्याने इंग्रजी शिकून घेतल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.