जेरुसलेम – इस्रायलने गाझामधून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे, असे अमेरिकेने इस्रायलला उद्देशून म्हटले आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्ध सुरू होउन १०० दिवस झाले आहेत. म्हणून अमेरिकेने हा सल्ला इस्रायलला दिला आहे. मात्र इस्रायल आणि अमेरिकेत या मुद्यावरून मतभिन्नता निर्माण झाल्याचे चित्र आहे. इस्रायलने माघार घेण्याऐवजी गाझामधील हमासची राजवट पूर्णपणे संपवून टाकण्यासाठी अधिक चढाई करण्याकडे आपला रोख कायम ठेवला आहे.
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनानमधील हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर मारा केला. त्यापूर्वी गाझामध्ये इस्रायलच्या सैन्याने जोरदार माराही केला होता. इस्रायलच्या मार् यामध्ये आतापर्यंत गाझाचा ८५ टक्क्यांपेक्षा जास्त रहिवासी बेघर झाले आहेत आणि २४ हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. हजारो लोकांना उपासमार करावी लागते आहे, म्हणून अमेरिकेने इस्रायलला माघार घेण्याचा सल्ला दिला आहे.
लोकसंख्येची घनता कमी असलेल्या भागातून माघार घेण्याबाबत अमेरिका खूप पूर्वीपासून इस्रायलला सांगत असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किरबे यांनी म्हटले आहे. इस्रायल हमासच्या या युद्धाची व्याप्ती आता वाढू लागली आहे. इराणचे समर्थन असलेल्या हिज्बुल्ला आणि हौथी या गटांनीही इस्रायलविरोधात आंतरराष्ट्रीय जहाजांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत गाझामध्ये युद्धविराम होत नाही, तोपर्यंत हल्ले सुरू राहतील, असे हिज्बुल्लाहचा नेता हसन नसराल्लाह याने म्हटले आहे. हे युद्ध अधिक भडकू नये, असा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
इस्रायल-हमास युद्धाचा १०० वा दिवस
इस्रायल- हमासमधील युद्धाला १०० जिवस होत असताना युरोप आणि मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये या युद्धासंदर्भात निदर्शने करण्यात आली. काही देशांनी इस्रायलच्या विरोधात तर काही देशांमध्ये इस्रायलच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. इस्रायलच्या समर्थनार्थ होणार् या निदर्शनांमध्ये हमासकडून ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेचीही मागणी केली गेली.