Prajkata Mali : झी मराठी वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेड लावले होते. या मालिकेतील कलारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक करण्यात आले. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. या मालिकेत प्राजक्ताने मेघनाची तर ललितने आदित्य नावाची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्राजक्ताने काल इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टबरोबर प्राजक्ताने मालिकेचं शीर्षक गीत आणि शूटिंगदरम्यानचे काही फोटो एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. प्राजक्ता माळीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन 10 वर्ष झाली. त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम.’
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, “आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत.” तर शेवटीने तिने महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयूष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना, असेही मजेशीररित्या म्हंटले आहे.
दरम्यान, ललित आणि प्राजक्तासह ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसारखे कलाकार देखील होते. आजही हे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.