विशेष न्यायालयाचे आदेश : दत्तवाडी हद्दीतील घटना
पुणे : सहा वर्षांच्या चिमुकलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी सुनावली. दंडापैकी 5 हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून द्यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
किरण चंद्रकांत ओव्हाळ असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने दत्तवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी कॉन्स्टेबल मेरूकर, महिला कॉन्स्टेबल पांढरे यांनी मदत केली.
फिर्यादी सफाई कामगार असून, त्यांचे पती कचरा उचलण्याचे काम करतात. तेरा, बारा, आठ आणि सहा वर्ष अशा चार मुली आणि चार वर्षांचा मुलगा घरात असायचे. यापैकी सहा वर्षांच्या मुलीला ओव्हाळ याने दि.7 नोव्हेंबर 2016 रोजी घरात बोलावून नेत तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर ती मुलगी आजारी पडली. दोन दिवसांनी फिर्यादी यांना हा प्रकार लक्षात आला. विचारणा केली असता, तिने घडलेला प्रकार सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने अत्याचाराच्या कलमांनुसार तुरूंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.