शिक्रापूर – टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला कारखान्यासाठी उसतोड कामासाठी कामगार पुरवितो, असे म्हणून शेतकऱ्याची तब्बल साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रवीण अशोक पाटील (रा. वाघडू, ता. चाळीसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
टाकळी भीमा येथील शेतकरी मनोज वडघुले यांचा शेतीसह कारखान्याचे ऊस तोड करुन कारखान्याला देण्याचा व्यवसाय आहे. वडघुले यांना नेहमी उसतोडणीसाठी कामगार लागत असल्याने ते विविध ठिकाणहून कामगार आणत असतात. वडघुले यांची त्यांच्या व्यवसायातून प्रवीण पाटील याच्या सोबत ओळख झालेली होती. पाटील याने वडघुले यांना तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला उसतोड कामगार आणून देतो, असे म्हणून कामगारांना उचल द्यावी लागेल असे सांगून कामगारांना देण्यासाठी वेळोवेळी तब्बल तीन लाख पन्नास हजार रुपये घेतले.
त्यानंतर पाटील हा पुन्हा वडघुले यांना भेटलाच नाही व कामगार देखील पुरवले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने याबाबत मनोज ज्ञानेश्वर वडघुले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहे.