तालिबानबरोबरच्या संघर्षात 10 पोलीस ठार

काबुल – मध्य अफगाणिस्तानच्या उर्झगन प्रांतात तालिबान आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या जोरदार संघर्षामध्ये किमान 10 पोलीस ठार झाले. या संघर्षात तालिबानचे 15 दहशतवादीही ठार झाले. उर्झगन प्रांतात गेल्या चार दिवसांपासून सुरक्षा रक्षक आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे. 

उर्झगन प्रांतातल्या गिझाब जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांवर सुमारे 100 तालिबानींनी हा हल्ला केला होता. तालिबान्यांनी जिल्ह्याच्या बहुतांश भागावर आपला ताबाही मिळवला आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही बाजूंमध्ये ही धुमश्‍चक्री सुरू आहे.

या धुमश्‍चक्रीदरम्यान तालिबान्यांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना ओलीस ठेवले आहे. हे दोन्ही अधिकारी संघर्षादरम्यान जखमी झाले असल्याचे समजते आहे. याच दरम्यान तालिबान्यांनी उर्झगन जिल्ह्यातील लुंदियानी आणि लेब्लान हाजियान भागातील पोलिसांवरही जोरदार हल्ला चढवला.

या संघर्षात दोन अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना तालिबान्यांनी ठार केले आणि अन्य दोघेजण जखमी झाले आहेत, असे देहरावत जिल्ह्याचे प्रभारी गव्हर्नर जलाउद्दीन वेडन यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.