पुणे : करोनाची साथ रोखण्यासाठी मोठया प्रमाणात लसीकरण पूर्ण होणे हा एक महत्वाचा पर्याय असून त्यासाठी खासगी हॉस्पीटलच्या माध्यमातून सोसायटयांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नगरसेवक राजाभाऊ बराटे व नगरसेवक उमेश गायकवाड यावेळी उपस्थित होते.
बालवडकर म्हणाले की, महापालिकेकडून शहरातील 100 टक्के लोकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ठ निश्चित केले आहे. त्यासाठी, शासकीय केंद्रावर लस मिळतानाच खासगी हॉस्पीटलमध्येही लसीकरण सुरू आहे. या हॉस्पीटलला कंपन्या तसेच संस्थाच्या ठिकाणी जाऊन लस देण्यास मुभा आहे. मात्र, त्याच वेळी शहरात अनेक मोठया सोसायटया असून त्या ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच या सोसायटयांचे क्लब हाऊस तसेच उद्याने या ठिकाणी मोठया प्रमाणात जागा असून त्या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारणे शक्य आहे. तसेच या सोसायटया पैसे भरून खासगी हॉस्पीटलच्या माध्यमातून लस घेण्यास तयार आहेत. त्यामुळे, महापालिकेने अशा सोसायटयांसाठी खासगी लसीकरणाचे दर निश्चित करून तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.