श्रीकांत कात्रे
सातारा – भारतीय जनता पक्षाने अखेर सातारा लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स संपविला. पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या बाराव्या यादीत सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांची अधिकृत उमेदवारी मंगळवारी जाहीर केली. आता सातारा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. त्यामुळे सातारा मतदारसंघातील या चुरशीच्या लढतीकडे देशपातळीपासून सर्वांचे लक्ष असणार आहे.
सातारा मतदारसंघातून निवडणूक लढविणारच असा निर्धार करत उदयनराजे यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र, पक्षाकडून मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. उमेदवारीची खात्री असल्याने उदयनराजे यांनी प्रचारासाठी मतदारसंघ यापूर्वीच पिंजून काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिंकात शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता उदयनराजे गुरूवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर होईपर्यंत महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपब्लिकन पक्ष व इतर अलिप्त होते. आता त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे उदयनराजे यांच्या प्रचारात सहभागी होतील, अशी शक्यता आहे. त्यामुळेच या मतदारसंघातील लढत आता लक्षवेधी बनण्याची खात्री व्यक्त होऊ लागली आहे.
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊन उदयनराजे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या चारशे पार घोषणेच्या पूर्तीसाठी काही निकष लावून पक्षाने उमेदवार निश्चित करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार उमेदवारांच्या आजपर्यंत बारा याद्या प्रसिद्ध केल्या. उदयनराजे पक्षाच्यादृष्टीने हुकुमी एक्का असल्याचे मानले जाते. त्यांची प्रतिमा केवळ सातारयापुरती मर्यादित नाही. महाराष्ट्रात त्यांची मोठी ताकद आहे. उदयनराजेंच्या करिष्म्यामुळे महाराष्ट्रातून मोदींच्या स्वप्नपूर्तीसाठी मोठे बळ मिळणार, याची जाणीव पक्षाला आहे. आता उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर करून महाराष्ट्रातील राजकारणावर प्रभाव मिळवण्याचा प्रयत्न पक्ष निश्चितपणे करेल यात शंका नाही.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले म्हणाले
“उमेदवारीबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. तोच विचार उराशी बाळगून मी 30 वर्ष लोकांची सेवा करतोय. त्यामुळे लोकांचे भरभरुन आशिर्वाद मला मिळाले. तरुण, माता-भगिनींची साथ मिळाली” असं उदयनराजे भोसले म्हणाले.
तुल्यबळ लढतीत घटक पक्ष महत्त्वाचे..
सातारा मतदारसंघामधील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सातारा, वाई, कोरेगाव, पाटण हे चार मतदारसंघ महायुतीकडे आहेत. तर कराड उत्तर आणि कराड दक्षिण हे दोन मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. महायुतीची ताकद मोठी वाटत आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्त्वाला माऩणारा वर्गही जिल्ह्यात मोठा आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी त्यांच्या त्यांच्या घटक पक्षांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भूमिका प्रचाराची गती वाढेल तेव्हा हळूहळू स्पष्ट होत जातील. या स्थितीमुळे सातारा मतदारसंघातील तुल्यबळ लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे हे आता नक्की झाले आहे.